…तर क्रिकेटप्रमाणे भारतीय कुस्तीपटूंचा जगभरात दबदबा निर्माण होईल- शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा- ‘‘कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. पण बदलत्या काळानुसार आपण मॅटवरील आधुनिक कुस्तीचे डावही शिकायला हवेत. तसे घडले तर क्रिकेटप्रमाणे भारतीय कुस्तीपटूंचा जगभरात दबदबा निर्माण होईल,’’ असे मत व्यक्त करून पवार यांनी महाराष्ट्र कुस्ती लीगला शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्य कुस्ती वर्तुळात चर्चेत असलेली ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ ९ ते १८ मार्च या कालावधीमध्ये खेळवली जाणार आहे. या लीगच्या सर्व लढती पुण्यात खेळवण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभा सदस्य सुभाष चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत लीगची मुंबईत घोषणा करण्यात आली. ‘‘स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला, म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवसाच्या मुहूर्तावर झी टॉकीजने पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती लीगची सुरुवात केली आहे. या मुहूर्तावर शरद पवार यांच्याबरोबर आम्ही या लीगची घोषणा करत आहोत,’’ असे चंद्रा यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या या लीगमध्ये परदेशातील कुस्तीपटूंचाही समावेश असणार आहे. या लीगमध्ये आठ संघांचा सहभाग असून प्रत्येक संघात दोन आंतरराष्ट्रीय, दोन राष्ट्रीय आणि राज्यातील चार खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि त्यातील संघांचे मालक यांची घोषणा येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहे.