आम्ही तयारीत होतो, पण पवारांनी सूचित केल्यामुळे अंतिम निर्णय घेतला नाही : कॉंग्रेस

blank

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांची लीलावती रूग्णालयात भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वायबी सेंटर येथे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वायबी चव्हाण सेंटर येथे होत आहे. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, आदी नेते उपस्थित आहेत.

तर दुसरीकडे काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा आहे. किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम) ठरवून पुढची दिशा ठरवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्ष शिवसेनेसोबत चर्चा करू असेही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या उलाढाली सुरु आहेत. शिवसेनेला राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यासाठी कसरत करावी लागली. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दिवसभर काथ्याकूट झाला. पण निर्णयाप्रती काँग्रेस येऊ शकली नाही.

दरम्यान,आता शिवसेनेला पाठींबा देण्यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली आहे. हे दोन्ही पक्ष आता एकमेकांवर आरोप करू लागले आहेत. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी थेट शरद पवारांना या वादात ओढले आहे. शरद पवार यांनी चर्चेसाठी आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना केल्यामुळे सरकार स्थापना पुढे ढकलली गेली. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला या संदर्भात माहिती दिली.

‘आम्ही तयारीत होतो, पण पवारांनी सूचित केल्यामुळे अंतिम निर्णय घेतला नाही. पवारांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आज मुंबईला जाणार होते. परंतु आजच्या ऐवजी परवा भेटू, असं नंतर पवारांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील नेते आज शरद पवारांची भेट घेणार नाहीत’, असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी बोट कॉंग्रेसकडे दाखवले आहे. जो काही निर्णय होईल तो एकत्रितपणे होईल. यासाठी आम्ही सोमवारी काँग्रेसशी संवाद साधला होता. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. आम्ही एकटयाने हा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात काही गैरसमजही नाही. आम्ही एकत्रित लढलो होतो आणि अजूनही एकत्रितच आहोत, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या