आता नवे साखर कारखाने नको : शरद पवार

sharad pawar

पुणे :  ऊस असो वा नसो प्रत्येक आमदाराला कारखाना हवा असतो. त्यांना माणसं सांभाळायची असतात. आम्हीही त्यासाठी प्रयत्न करून कारखाने काढले, त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहे.यापुढे नवीन कारखाने काढू नका, असा कानमंत्र माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. काही जण कारखाने काढायचे म्हणत आहे. काढा बाबांनो कारखाने, पण कसे तोंड द्यायचे ते पण बघा, आम्हीही तुमच्याकडून शिकू, असा टोलाही पवार यांनी लगावला.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ‘ऊस विकास कृती कार्यक्रम’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख, जयप्रकाश दांडेगावकर, आमदार अजित पवार, आ.जयंत पाटील,आ.राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, महाराष्ट्रात साखर कारखानदारीचे चित्र चांगले नाही. उसाचे घटलेले क्षेत्र, दर हेक्टरी उत्पादन, उतारा वाढविण्यासाठी काळजी घेतली नाही तर कारखानदारी अडचणीत येईल. यातून मार्ग काढण्यासाठी ऊस विकास कृती कार्यक्रम तयार करून त्याची गांभीर्याने नियोजनबद्ध अंमलबजावणी केली पाहिजे.