नाठाळ बैलांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे, पवारांचा गयारामांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला चांगलीचं गळती लागली आहे. मात्र ही गळती रोखण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार जिल्हानिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधाण्यासाठी दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांचा दौरा आज जालना जिल्ह्यात आला. यावेळी शरद पवारांनी गयारामांवर चांगलीचं टोलेबाजी केली.

यावेळी शरद पवार म्हणाले की, बैलजोडीत काही बैलं नाठाळ असतात. नांगरणी करताना काही बैल वाकडे चालतात. मग आपण त्यांच्या जागेची अदलबदल करतो. तरी तो नाठाळ बैल तसाच वागला तर त्याला आठवड्याचा बाजार दाखवतो. आज हे बैल तसेच झाले आहेत. मतदानाच्या दिवशी यांना बाजार दाखवा. तसेच फक्त बटन दाबायची वेळ येऊ द्या, मग यांचा विकास कुठे पाठवायचा ते आपण ठरवू. कुठे पळापळ झाली तरी जालन्यातील राष्ट्रवादीचा कोणीही कुठे जाणार नाही याचा मला विश्वास आहे, असे यावेळी शरद पवार म्हणाले.

दरम्यान पक्षांतर केलेले नेते म्हणतात पवार माझ्या ह्रदयात आहेत. मी जर तुमच्या ह्रदयात आहो तर मग पक्ष का सोडून जात आहात, असा सवाल त्यांनी केला. तसेच आघाडीचे सरकार आल्यास सर्वाना सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.