fbpx

पवार साहेब नगर दक्षिण तुम्ही लढा, नाहीतर सुजय विखेंना सोडा !

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मात्र, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात नक्की कोणी लढायचं याच घोड मात्र अजून देखील अडलेलच आहे. विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे हे नगर दक्षिण मधून खासदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण राष्ट्रवादी काही केल्याने हा मतदार संघ कॉंग्रेसला सोडण्याच्या भूमिकेत दिसत नाही. अशातच आता या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच नगर दक्षिण मधून निवडणूक लढवण्याची गळ घालण्यात आली आहे.

दक्षिण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती, गुन्हेगारी, बेरोजगारी यासारखे प्रश्न गंभीर झाले आहेत. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे माहित नसलेली व्यक्ती नगरकरांच्या माथी मारली गेली आहे. प्रश्न सोडविण्यास विद्यमान खासदार अपयशी ठरल्याने खुद्द शरद पवार यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी अन्यथा ही जागा डॉ. सुजय विखे यांना सोडावी, अशी मागणी महाराष्ट्र युथ कौंन्सिलचे अध्यक्ष रणजित बाबर यांनी केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युथ कौंन्सिलच्या नगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष रणजीत बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. या बैठकीत नगर दक्षिण मधील विकास कामे, दुष्काळी परिस्थिती, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलतांना रणजीत बाबर म्हणाले की, अहमदनगर दक्षिण मतदार संघातून गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र, खासदाराची कामे काय असतात ? ती कामे कोणत्या पध्दतीत आणि कोणत्या पातळीवर केली जातात, त्याचा साधा अभ्यास नसलेले लोकप्रतिनिधी नगरकरांच्या नशिबी मारले गेले आहेत. शेती, सिंचन, बेरोजगारी या सारख्या प्रश्नावर अभ्यास असणारे नेते शरद पवार यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवावी किंवा शेती व बेरोजगारी आदी प्रश्नांची जाण असलेले डॉ.सुजय विखे यांच्यासाठी ही जागा सोडावी.

डॉ. विखे यांच्या उमेदवारीला युवकांचा पाठींबा असून यासंदर्भात लवकरच युवकांचे एक शिष्टमंडळ शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही रणजीत बाबर यांनी स्पष्ट केले.