मराठा आणि बहुजन समाजात फुट पडत आहे याचा खुलासा, शरद पवार यांनी करावा – एकनाथ खडसे

blank

टीम महाराष्ट्र देशा :  मराठा समाज आरक्षणाच्या मागण्या मांडत असून, हे आंदोलन हाताळताना सरकारची अशी कोणती चूक झाली, ज्यामुळे मराठा आणि बहुजन समाजात फुट पडत आहे याचा खुलासा, शरद पवार यांनी करावा असं आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलं आहे .अहमदनगर मध्ये ओ बी सी फौंडेशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, ओबीसी संघर्षाला खऱया अर्थाने 1990 साली सुरुवात झाली. गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, ना. स. फरांदे यांनी या विषयाला वाचा फोडली. आज ओबीसी समाज एकत्र आला पाहिजे. ओबीसीमध्ये 350 जाती आहेत. त्या वेळेला हे काम अवघड होते. अनेक इगो होते पण मुंडेंनी पुढाकार घेतला आणि ओबीसी चळवळ सुरू झाली. सध्या आरक्षणाचा विषय सुरू झाला आहे, मात्र फेरजनगणना झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकतो’ असे खडसे यांनी सांगितले.

मी बोलतच राहणार!
‘मी बोलतच राहणार. माझे काय चुकले हे अगोदर सांगा. न केलेल्या गुह्याची शिक्षा मी भोगतोय’ असे सांगत खडसे म्हणाले, ‘लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. प्रश्न सोडविणार नसला तर नेता कोण राहणार? शांत बसलो तर घातक आहे. मंत्रीपदापेक्षा मला समाज मोठा आहे’ असे त्यांनी सांगितले. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याबाबत दुमत नाही, मात्र 16 टक्के आरक्षण देऊन त्यांना ‘कुणबी’ जाहीर करा असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले होते. सर्वांना ‘कुणबी’ जाहीर केले तर ते ओबीसीत येतील. ते कसे चालेल’ असे सांगून खडसे म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. कोणाचेही आरक्षण हिरावून घेता कामा नये.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तसे झाल्यास आमच्या सरकारला जाब विचारणारा मी पहिला माणूस असेन’ असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, ‘सरकारकडे आरक्षणाची आकडेवारी आहे का? वास्तविक जातीनिहाय फेरजनगणना झाली तरच ओबीसी किती आहेत हे लक्षात येईल. जनगणना झाल्यावर कोणाला काय आरक्षण द्यायचे ते तुम्ही द्या’ असे ते म्हणाले.

आज पासून शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर