मावळात शेतकरी हक्क मागत असताना त्यांना गोळ्या घातल्या गेल्या : मोदी

टीम महाराष्ट्र देशा- कॉंग्रेसच्या सत्ताकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्यांनी लक्ष दिले नाही. आज शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारे शरद पवार यांनी मावळात शेतकरी हक्क मागत असताना त्यांना गोळ्या घातल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. कॉंग्रेस राष्ट्रवादीने सिंचनाच्या नावावर जनतेला लुटलं, असा आरोप देखील मोदींनी यावेळी केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.आपल्या भाषणातून मोदींनी विरोधी पक्षांची अक्षरशः पिसे काढली.

महाराष्ट्रातीलच असणारे शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री होते, मात्र तरीही राज्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्या नाहीत. भाजप सरकारने महाराष्ट्र आणि देशातील अनेक भागात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवत दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी येथील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भातील १० पैकी १० जागा भाजप- शिवसेना जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच विदर्भातून काँग्रेस- राष्ट्रवादीचा सुफडा साफ होईल, असा दावा त्यांनी केला.