fbpx

२३ तारखेनंतर निर्णय घेऊ, आता केवळ निवडणुकीचं विश्लेषण; शरद पवारांचा सावध पवित्रा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, तर २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे, निकाल जाहीर होण्यापुर्वो भाजपला पुन्हा सत्ता मिळणार नसल्याचा अंदाज बांधत विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नायडू यांनी काल एका दिवसात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दरम्यान, नायडू यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली.

नायडू यांच्या भेटीवेळी परिस्थितीचं विश्लेषण करत असून २३ तारखेनंतरच निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे, त्यामुळे पवार हे सावध पवित्रा घेत असल्याचं दिसत आहे. नायडू यांच्यासोबत झालेली बैठक औपचारिक असून आम्ही कुठे कुठे जिंकू शकतो यावर विश्लेषण केलं आहे. सध्या २३ तारखेची वाट पाहत असून निकालानंतर निर्णय घेऊ. असे पवार यांनी सांगितले आहे.