टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात भल्या भल्या दिग्गजांना कात्रजचा घाट दाखविल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार चर्चेत आहेत. राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या पवारांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर भाजपच्या तोंडचे पाणी पळविले.
राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट घडली की त्या पाठीमागे शरद पवारा साहेबांचा हात असेल असा एक अलिखित नियमच आहे. मात्र शरद पवार यांच्या लग्नाची गाठ बांधण्यासाठी शरद पवारांचा नाही तर पवारांच्या जेष्ठ बंधूंचा हात होता.शरद पवार यांच्या बद्दल जाणून घेण्याची मराठी माणसाला कायम आस असते. शरद पवार यांच्या कठीण काळात त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या त्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहिलेल्या आपणास पहायला मिळतात. आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण शरद पवारांचे लग्न कसे जुळले होते हे जाणून घेणार आहोत.
शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू बापूसाहेब यांनी अशी दिली होती शरदरावांची ओळख करून
एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बीकॉम झाला आहे. पण स्वत: काही करत नाही. गावाकडे शेती आहे. नुकताच आमदार झाला आहे. असे स्वत: शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू बापूसाहेब यांनी प्रतिभाताईंचे वडील सदू शिंदे यांना सांगितले.
सदू शिंदे हे उत्कृष्ठ किकेटपटू होते, त्यांची ज्येष्ठ कन्या जिजा, म्हणजेच प्रतिभा हिला पाहाण्याचा कार्यक्रम ठरला. परंतु, मुलगा शिकलेला असून, काहीच करत नाही, हे ऐकताच बिन कामाचे स्थळ, म्हणत सदू शिंदे यांच्या वडिलांना पसंत पडणे शक्यच नव्हते. पण हे स्थळ म्हणजे साक्षात बापूसाहेबांचा धाकटा भाऊ शरद आहे, हे कळल्यावर प्रश्नच मिटला.
त्या काळी क्रिकेट फार कमी खेळले जायचे. प्रतिभाताईंच्या वडिलांच्या वाट्याला तर ते फारच कमी आले. ते फक्त सात कसोटी सामने खेळले. परंतु तेवढ्या जोरावर त्यांनी ‘एक उत्कृष्ट गुगली गोलंदाज’ असा नावलौकिक मिळवला आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले. विजय मर्चंट, रंगा सोहनी, पॉली उम्रीगर, विजय हजारे, खंडू रांगणेकर, दत्तू फडकर हे वडिलांचे सहकारी होते.
असा झाला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तात याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली होती. या वृत्तानुसार,शरदराव प्रतिभाताईंना पाहायला पुण्यात आले. पवारसाहेबांनी खादीचा जाडाभरडा गर्द गुलाबी बुशशर्ट आणि तसलीच पण हिरवीगार पँट परिधान केली होती. शेजारचे वर्तमानपत्र उघडून चाळत होते. शेजारचे वर्तमानपत्र उघडून त्यांनी त्यात जे डोके घातले, ते शेवटपर्यंत वर काढले नाही. परंतु नजर आणि समज तेज असल्यामुळे जे काही टिपायचे, ते नेमके टिपले होते.आजोबांनी मुलगा पाहिला. पवारसाहेबांमधील वक्तशीरपणा त्यांना एका क्षणात ओळखला आणि चटकण होकारही दिला.
शरद पवारांच्या विवाहाच्या दिवशी प्रचंड पाऊस
१ ऑगष्ट १९६७रोजी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह बारामतीत झाला. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता, विशेष म्हणजे विवाह समारंभाला सगळ्या पंचक्रोशीतील माणसे उपस्थित होती. आपल्या आमदाराच्या विवाहाला ते सगळे उत्साहाने आले होते.तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला हजर होते.
पुढे पवारांच्या घरातील व्यवहारचातुर्य आणि शिंदेंच्या घरातील शिस्त. पवारांचे आदरातिथ्य आणि शिंदेंची स्वच्छता व टापटीप. प्रतिभाबाईंनी सासर आणि माहेर या दोन्ही घरातल्या चांगल्या गोष्टी तेवढ्या उचलल्या आणि त्यांची सांगड घालून एक वेगळीच घडी बसवली. शरद पवारांची पत्नी असणे हे पाहणाऱ्याला राजमुकुट मिरवल्यासारखे वाटेल. पण हा मुकुट किती काटेरी आहे, ते धारण करणाऱ्यालाच ठाऊक.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
…तोपर्यंत मी कोरोनाची लस घेणार नाही, राजीव बजाज याचं मोठ विधान
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी