शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नागरिकांच्या मागण्यांचे आणि व्यथांचे निवेदन केले सादर

blank

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगलीला आलेल्या महापुराच्या उपाययोजनेबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी नागरिकांच्या मागण्यांचे आणि व्यथांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. हसन मुश्रीफ, खा. सुनील तटकरे, आदी नेते उपस्थित होते.

महापूर ओसरल्यानंतर शरद पवार यांनी कोल्हापूर सांगलीचा दौरा केला होता. यावेळी अनेक पूरग्रस्तांशी पवारांनी संवाद साधला. लोकांनी त्यांच्या व्यथा तसेच मागण्या शरद पवारांसमोर मांडल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह अन्य काही भागात अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या महापुराने नदीकाठावरील गावांमध्ये अभूतपूर्व अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या भागाचा दौरा केला असता पूरग्रस्तांनी माझ्याशी संवाद साधून आपल्या व्यथा तसेच मागण्या माझ्यासमोर मांडल्या. त्यावेळी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरग्रस्तांच्या मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्याची ग्वाही मी दिली होती. त्यानुसार पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे, असे पवारांनी निवेदनात नमूद केले.

तसेच ‘न भुतो न भविष्यती‘ अशा महापुराच्या संकटातून ग्रामीण व शहरी जनतेला बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या नुकसानाची योग्य भरपाई करण्यासाठी, बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी, मूलभूत सोयीसुविधा पुनर्स्थापित होण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. राज्याचे प्रमुख म्हणून संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही मांडलेल्या समस्या व सादर केलेल्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मुख्यमंत्री तातडीने उपाययोजना करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे हे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मी जाहीर पत्रकार परिषद आयोजित करून पूरग्रस्त भागातील बाधीत जनतेच्या मागण्यांकडे राज्यसरकारचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून राज्यसरकारने काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते. मी केलेल्या जाहीर मागण्यांची दखल घेऊन राज्यसरकारने मंत्रीमंडळ उपसमिती बैठकीत हा विषय प्राधान्याने घेतला. मात्र काही मागण्या आंशिक स्वरूपात मान्य झाल्या असून त्यात त्रुटी राहिलेल्या आहेत. त्यामुळे पीडित जनतेने मांडलेल्या व्यथा व केलेल्या मागण्या या निवेदनाद्वारे विस्ताराने मांडल्या.