राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हंटले आहे.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी दुष्काळ दौरे सुरु केले आहे. शरद पवार यांनीही दुष्काळ दौरा केला. शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

याचदरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी, राज्यात मोठया प्रमाणात दुष्काळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सतत दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. चारा छावण्या असतील किंवा जनावरांना पाण्याची व्यवस्था असेल याकडे सरकारने पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या बागा सुकल्या आहेत. या बागा सुकल्यामुळे येणाऱ्या काळात त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे यासंदर्भात शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी का द्यायला हवी हे मुख्यमंत्र्यांना समजवून सांगणार आहेत. असे मलिक यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी पराभवाने खचून न जाता दुष्काळी भागाचे दौरे करा असा सल्ला कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला होता. तसेच शरद पवार स्वत: राज्यातील दुष्काळ भागाचा दौरा करत आहेत.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आज काळ कठिण आहे. मात्र आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रयत्न करू असे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी व नागेवाडी या गावात दुष्काळी भागाची पाहणी करताना म्हंटले होते.