भेट शरद पवार – नारायण राणेंची, कार्यकर्त्यांत चर्चा मात्र रोहित पवारांची

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भेटले. कणकवली येथील राणेंच्या घरी जाऊन पवारांनी त्यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. मध्यंतरी अजित पवार आणि उद्धव ठाकरे वादामध्ये रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट चांगलाच भाव खाऊन गेली. आता पवारांच्या राणे भेटी दरम्यान रोहित यांच्या उपस्थीतीने सुप्रियाताई आणि अजित दादांनंतर राष्ट्रवादीमध्ये रोहित पवारच असे समीकरण तयार होत असल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांच्या गोटात सुरु आहे.

शरद पवार हे मागील दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या तिकीटासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीनं केला होता. त्यामुळे पवार-राणेंच्या भेटीला महत्व प्राप्त झाल आहे. पवार-राणे यांच्या या भेटीतून महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे जुळणार का ? हे येणारा काळच सांगू शकतो.

दरम्यान, पवारांचा हा दौरा कौटुंबीक असल्याचे सांगण्यात येत असले तरी आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर तळकोकणातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सिंधुदुर्गमधील संघटनात्मक घडी विस्कळीत झाली होती. ही पुन्हा बसवण्याचे पवार यांचे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

‘गृहमंत्री साहेब आता तरी झोपेतून उठा’ ; आरोपीकडून पोलिसाला मरेपर्यंत मारहाण

You might also like
Comments
Loading...