मोठी बातमी : शरद पवारांचे मोदींना आणखी एक पत्र, केली ‘ही’ मागणी

modi sharad pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी केंद्र सरकारला बांधकाम व्यवसायिकांना मदत करण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत सापडलं आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना व्याजावर सूट देण्यात यावी किंवा आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी पत्रामार्फत केली आहे.

गेल्या काही दिवसात पवारांनी मोदींना लिहिलेले हे चौथे पत्र आहे. पहिल्या पत्रात (26 एप्रिल) ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत पवारांनी महाराष्ट्राला अतिरिक्त 1 लाख कोटी देण्याची मागणी केली होती. तर दुसऱ्या पत्रात (3 मे) शरद पवार यांनी ‘आयएफएससी’ केंद्र गांधीनगरमध्ये नेल्याने देशाचे आर्थिक नुकसान तर होईलच, मात्र मुंबईचे महत्त्व कमी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होईल, असा इशारा केंद्राला दिला होता.

तिसऱ्या पत्रात (15 मे) शरद पवार यांनी मोदींकडे साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. यासाठी शरद पवार यांनी केंद्र सरकारला सहा उपाय सुचवले होते.

आता शरद पवार हे सरकारला बांधकाम व्यवसायिकांसाठी मैदानात उतरले आहेत. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. बांधकाम क्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रकरणी स्वत: लक्ष देवून लवकर उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.