शरद पवार मोठे नेते, मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात- देवेंद्र फडणवीस

fadanvis-pawar

मुंबई : गोव्यामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधतांना ‘शरद पवार मोठे नेते, मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात’, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ‘अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’गोव्यामध्ये भाजपाला प्रचंड मान्यता आहे. मनोहर पर्रिकरांची परंपरा येथे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील चांगले काम केले आहे. तसेच मोदींबद्दल देशामध्ये असलेली सकारात्मकता या सर्व गोष्टी एकत्र केल्यानंतर गोव्यामध्ये आम्हाला विजय मिळेल असा मला विश्वास आहे. यावेळी आमची पूर्ण बहुमताची तयारी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला बहुमत मिळेल आणि त्यासाठी आम्ही गेले काही दिवस तयारी करत आहोत.’

दरम्यान, शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले नाही याची वेदना सलत आहे असा प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की,’शरद पवार मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही त्यांची वेदना त्यांच्या मनात सलत आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणात बोलाव्या लागतात. तुमच्या विरोधकांना उत्तरे द्यावी लागतात. तसेच सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे कुठल्याही पक्षाला वाटते पण आम्ही हातपाय गाळून बसलेलो नाही. विरोधी पक्षाचे उत्तम काम करत आहोत आम्हाला काही चिंता नाही’, असेही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या