शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘असे’ दिले प्रत्युत्तर

टीम महाराष्ट्र देशा – वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पहिल्या सभेत पवार कुटुंबियांवर तुटून पडले होते. यावर आता खुद्द शरद पवार यांनी मोदींना प्रतिउत्तर दिले आहे . आज कोल्हापूरमध्ये आयोजित महाघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘राष्ट्रवादी हा कोणा एकट्या दुकट्याचा नाही, तर रस्त्यावरील कार्यकर्त्यांनी तो मोठा केला आहे. त्यामुळे मोदींनी माझ्या पक्षाची काळजी करू नये ‘ अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर दिले.

देशामध्ये दुष्काळाचे वातावरण असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काही तरी बोलतील अशी अपेक्षा होती. महात्मा गांधीजींच्या वास्तव्य झालेल्या ठिकाणी शेवटच्या घटकांचा विचार ते करतील असेही वाटले होते, पण त्यांनी माझ्यावर व्यक्तीगत टीका केली असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाआघाडीच्या मेळाव्यात केला.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

राष्ट्रवादी हा कोणा एकट्या दुकट्याचा नाही, तर रस्त्यावरील कार्यकर्त्यांनी तो मोठा केला आहे. त्यामुळे मोदींनी माझ्या पक्षाची काळजी करू नये. अजित पवार उत्तम प्रशासक आहेत. माझ्यावर कोल्हापुरी संस्कार झालेत त्यामुळे मोदींनी चिंता करू नये, असेही ते म्हणाले. देशात गांधी घराण्याचे मोठे योगदान आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भूमिकाही महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, तप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथी सभेत शरद पवार हे हवा कोणत्या बाजूला वाहते हे ओळखतात, त्यामुळेच त्यांनी मतदानापूर्वीच निवडणुकीतून माघार घेऊन मैदानातून पळ काढला. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गृहकलह सुरु असून अजित पवार यांनी त्यांना हिट विकेट केलं आहे, असे म्हणत पवार कुटुंबियांवर निशाणा साधला.