fbpx

मोदींनी पदाचा आणि शपथेचा द्रोह केला आहे : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : वर्ध्यातल्या मोदींच्या भाषणा नंतर पवार कुटुंबीय त्यांच्यावर केलेल्या टीकांवर प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मोदींनी आमच्या कुटुंबाची काळजी करू नये असा म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तर अजित पवार हे उत्तम प्रशासक आहेत असे देखील ते म्हणाले आहेत. आज कोल्हापूरच्या आघाडी मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

यावेळी पवारांनी मोदींना चांगलेच शाब्दिक फटकारे मारले आहेत. पवार म्हणाले की, मोदी कुठे गेले तर गांधी कुटुंबावर टीका करतात. मात्र इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवून इतिहासच नाही तर भूगोल घडवला, असंही शरद पवार म्हणाले. तसंच सोनिया गांधी यांची स्तुती करत राजीव गांधींची हत्या झाल्यानंतरही त्यांनी देश सोडला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी जपली, असंही पवारांनी यावेळी नमूद केलं.

पुढे पवार म्हणाले की, मोदींनी देशात केवळ हिंदू-हिंदू सुरु केलं आहे. मात्र देशासाठी सर्वच जातीधर्माचं योगदान आहे. त्यामुळे मोदींनी पदाचा आणि शपथेचा द्रोह केला आहे. असा द्रोह करणाऱ्या व्यक्तीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान वर्धा येथे झालेल्या प्रचार सभे मध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि कुटुंबीय यांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, पवार यांनी वेळीच सावध पावले उचलत निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला आहे तर आता पवार कुटुंबात वाद सुरु झाले आहेत. तसेच अनेक वर्ष केंद्रात आणि राज्यात मंत्री असून देखील राज्याचा विकास पवार यांनी केला नाही असे देखील मोदी यावेळी म्हणाले होते.