उशिरा का होईना राज्य सरकारला जाग आली ! जल आपत्तीवरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना मदत केली पाहिजे. मात्र काही राज्यकर्ते येत्या निवडणुकीच्या कामात गुंतले होते. पण उशिरा का होईना ते आता काम करतायत हे चांगले आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

राज्यात पूरपरस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते जनादेश यात्रेमधे होते. यावरून विरोधकांनी जोरदर टीका केली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. तर कोल्हापूर – सांगलीत अडकलेल्या आपत्तीग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाचे सबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यावरून शरद पवार यांनी टोला लगावला आहे.

पवार म्हणाले की, राज्यात पूरपरीस्थिती बिकट आहे. अनेक भागात अति गंभीर परस्थितीमधे संकटातील लोकांना प्रथम बाहेर काढले पाहीजे. आपले मुख्यमंत्री राजकीय कामात गुंतले होते. उशिरा का होईना मुख्यमंत्री कामाला लागलेत ही चांगलीच गोष्ट आहे. तसेच राज्य सरकारकडून मदतकार्यात उशिर झाला. आपदग्रस्त परिस्थितिमधे योग्य वेळी लक्ष दिले असते, तर कदाचित नुकसान कमी झाले असते, असेही ते म्हणाले.

दरम्यान राज्यात गेले दोन दिवस पावसाने कहर केला आहे. कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक पुरात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहेत. तसेच एनडीआरएफ आणि नेव्हीचे जवान देखील बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.