साताऱ्यात भर पावसात पवारांनी उदयनराजेंना धुतलं

blank

टीम महाराष्ट्र देशा : परतीच्या पावसाने राज्याच्या काही भागात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे याचा फटका निवडणुकीच्या प्रचारसभांनाही बसत असल्याचं दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली आहे. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.

पवार म्हणाले की, एखाद्या माणसाकडून चूक झाली, तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभेच्या उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीरपणे कबूल करतो. मी लोकसभेला चुकीचा उमेदवार निवडला. मात्र आता सातारची जनता विचारांची पक्की आहे. या निवडणुकीत ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायची संधी मिळेल, त्या निवडणुकीचा निकाल संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. सातारा जिल्हा विचाराचा आणि मताचा पक्का आणि शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने जपणारा आहे. तेव्हा तुम्ही योग्य उमेदवार निवडाल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान वयाच्या ७९ व्या वर्षीही शरद पवार हे निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते शरद पवारांना लक्ष्य करत आहेत. मात्र आज शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर पवारांच्या या सभेचे फोटो चांगलेचं व्हायरल होत आहेत.