विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार

कोल्हापूर: केंद्रातील मोदी सरकारचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचा डाव आहे, त्यांनी संविधानाला हात लावण्याचे काम करू नये. मोदींनी विस्तवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा , जनता हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रावादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदींचा देशात देशात हुकूमशाही आणण्याचा डाव आहे, निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे, काळा पैसा, गंगा स्वच्छता, राम मंदिर आणि सर्वच गोष्टींवर खोटी आश्वासने  देण्याशिवाय या सरकारने काही केलेले नाही, असा घणाघात पवार यांनी केला आहे. डोक्यात सत्तेची मस्ती गेल्याने माज आलेल्या सरकारला धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, भाजप सरकाच्या काळामध्ये 11 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हजारो शेतकर्‍यांची कुटुंबे उघड्यावर आली असताना सरकार मदत करत नाही. उलट भाजपचे नेते शेतकर्‍यांबद्दल अपशब्द बोलत असल्याची टीका पवारांनी केली आहे.