fbpx

‘जेव्हा मी शेतकऱ्यांचा मुद्दा काढतो तेव्हा ते म्हणतात तुम्ही खाणाऱ्यांचा विचार करत नाही’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील ७ जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीचे भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या निवडणूक प्रचारार्थ साकोली येथील प्रचार सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

“पाच वर्षात यांनी काय केले. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत दिली नाही, कर्जमाफी दिली नाही, त्याला उठवून उभं करण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा दिल्ली आम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा काढतो त्यावेळी तेव्हा ही मंडळी आमचा विरोध करतात म्हणतात तुम्ही खाणाऱ्यांचा विचार करत नाही. पिकवणारा टिकला तरच खाणार टिकेल हे सरकार लक्षात घ्यावे. या सरकारच्या काळात फक्त महाराष्ट्रातच ११ हजारांच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माझ्यावर टीका करत आहेत. माझ्यावर टीका करून प्रश्न सुटणार आहेत का ? मी सत्तेत आहे की तुम्ही ? नोटाबंदी करून या सरकारने देशाची आर्थिक स्थिती बिघडवण्याचे महापाप केले.” असा घणाघात शरद पवार यांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी माझ्या कुटुंबावर टीका करत आहेत. भाजपला मोठे करणारे दोन नेते अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी, दुर्दैवाने वाजपेयी आपल्यात नाही मात्र अडवाणी यांची काय परिस्थिती करून ठेवली यांनी ? अडवाणींना यांनी अडगळीत टाकले. हे स्वतःच्या नेत्यांनाच न्याय देत नाहीत तुम्हा आम्हाला काय देणार ? त्यामुळे आता परिवर्तन घडवायचे आहे. अशी जोरदार टीका देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

भंडारा गोंदिया शेतीसाठी महत्त्वाचे योगदान देणारा जिल्हा आहे. अवघ्या देशात पिक आणि धान इथून जायचे. पण आज चित्र चांगले नाही. शेतकऱ्यांच्या घामाला पैसा मिळत नाही. या सरकारच्या काळात आत्महत्या वाढल्या आहेत. लोकांना वाटलं मोदींना संधी देऊन बघावं पण मोदींनी फसवले. युपीए सरकार असताना इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला धान जगात कसा पाठवता येईल याचा प्रयत्न केला. अस देखील पवार म्हणाले आहेत.