मुख्यमंत्र्यांना स्वप्नातही मीच दिसतो, ते सातत्याने शरद पवार-शरद पवार घोकत असतात : शरद पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष चांगलेच सक्रीय होताना पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपचे सत्र सुरु आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना पक्षात येण्यासाठी विरोधकांची रांग लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, यात्रेदरम्यान ते सरकारने केलेल्या कामावर पाच मिनिटे बोलतात आणि बाकीच भाषण फक्त शरद पवारांवर करतात. कारण त्यांना स्वप्नातही मीच दिसतो. त्यामुळे ते सातत्याने शरद पवार-शरद पवार घोकत असतात, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी अजून म्हातारा झालेलो नाही, अनेकांना घरी पाठवायचे आहे. जे गेलेत त्यांची नावे काढू नका. जो मावळणार आहे त्याची चर्चा कशाला करायची? इतिहासाचे मानकरी होण्याऐवजी दुसऱ्याच्या दारात सुभेदारी स्वीकारण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली, असे पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सुरु असणारी पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार कार्यकर्त्यांशी सवांद साधणार आहे.