समाजामध्ये जातीयवाद निर्माण करणाऱ्या भाजपला ‘चले जाव’ म्हणा

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजप सरकारवर निशाणा साधला  आहे. त्यांनी समाजामध्ये जातीयवाद निर्माण करणाऱ्या भाजपला चले जाव म्हणा असं विधान केले आहे.

शरद पवार यांनी अहमदनगर येथे बोलताना ‘आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आता संघर्ष आणि लढाईला सुरुवात झाली आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्याची ओळख ही देशासाठी महत्त्वाची कामगिरी केलेला जिल्हा अशी होते. देशाच्या स्वातंत्र्याचे बिगुल याच भागातून वाजले आहे असं विधान केले.

तसेच पुढे बोलताना ‘त्यामुळे प्रतिगामी विचारांची, जातीयवाद निर्माण करणारी, काळ्या आईचा इमान राखणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी भाजपा आणि तत्सम संघटनेला चले जाव हे सांगण्याचे काम आपल्याला करायचे आहे अस विधान केले आहे. आपण मावळतीचा इतिहास बघणारे नाहीत तर उगवतीचा इतिहास बघणारे आहोत हे विसरुन चालणार नाही. अनेकजण आपल्याला सोडून गेले. त्यांना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असंही पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आमच्या संस्थेची चौकशी सुरू झाली आहे, आम्हाला नोटीस आली आहे आणि आता आम्हाला विकास करायचा आहे़ अशा सबबी सांगून काही जण पक्षातून बाहेर पडले़ यांनी नको ती लफडी केली म्हणूनच ईडी अन् येडी यांच्या मागे लागली आहे़. काही जण १४ वर्षे मंत्री होते तेव्हा त्यांना विकास करायचे सुचले नाही का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांना लगावला आहे.