पडझड रोखण्यासाठी शरद पवार आज सोलापुरात, स्वागताला मोजकेच नेते विमानतळावर

blank

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार गळती लागली आहे. पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडत भाजप – शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सुरु असणारी पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.विशेष म्हणजे कधीकाळी पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी होत असे, आज मात्र काही मोजक्याच नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यभरात सुरु असणारी पडझड रोखण्यासाठी शरद पवार हे आता स्वतः मैदानात उतरले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी सोडली आहे. त्यामुळे उरलेल्या नेत्यांनासोबत घेत रणनीती आखण्यासाठी सोलापूरमध्ये बैठक पार पडणार आहे. जिल्ह्यातील अकराही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी यावेळी होणार आहे.

सोलापूर जिल्ह्याची ओळख आजवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून होती, परंतु आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी पालकमंत्री दिलीप सोपल, करमाळ्याच्या रश्मी बागल यांच्यासह प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.