fbpx

संग्राम जगताप हे खणखणीत नाणं, वाजणारा बंदा रुपया – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : तरुणांना पुढे आणण्याच्या जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. आम्ही जास्तीत जास्त तरुण उमेदवार दिले आहेत. संग्राम जगताप हे खणखणीत नाणं आहे. वाजणारा बंदा रुपया आहे. त्यामुळे हा आवाज लोकसभेत जायलाच हवा. अशा शब्दांत अहमदनगर दक्षिण लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांचं कौतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. ते शेवगाव मध्ये झालेल्या प्रचार सभेत बोलत होते.

३५० कोटी रुपयांचे विमान १६५० रुपयांचे झाले कसे? राफेलबाबत आम्ही सभागृहात मोदींना विचारल्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. उलट त्याची माहिती गुप्त आहे, असे सांगितले. सुप्रिम कोर्टाला तर राफेलची कागदपत्रे चोरीला गेली असे सांगितले. गुप्त कागदपत्रे चोरीला जातातच कशी? बोफर्सप्रमाणे राफेलचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही केली. पण हे सरकार तशी तयारी दर्शवीत नाही कारण ते स्वच्छच नाही. मोदी म्हणालेले ‘ना खाऊँगा ना खाने दुँगा’ मग राफेलच्या वेळेला नेमके काय झाले? अस शरद पवार म्हणाले आहेत.

आपल्या देशात पाऊस पडला नाही, पिक आले नाही, कर्जाचा बोजा वाढला तर शेतकऱ्यांना थकबाकीदार म्हटले जाते. त्यामुळे त्याला कर्ज मिळवण्यास अडचण होते. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या समस्येवर तो प्रश्न कोणत्या पक्षाने मांडला आहे याचा विचार न करता मी त्यांचे काम करतो. एकदा गुजरातमध्ये दुष्काळ पडला होता. सरदार सरोवरला पाणी सोडण्याची मागणी होती. तेव्हा महाराष्ट्राने गुजरातला हातभार लावला. मात्र मोदींची भूमिका आता बदलली आहे. शेतमालाला भाव मिळावा त्यासाठी मी संसदेत मागणी केली होती तेव्हा मोदी मला म्हणाले होते की तुम्ही खाणाऱ्यापेक्षा पिकवणाऱ्याचा विचार जास्त करता. मी त्यांना सांगू इच्छितो की पिकवणारा जगला तरच खाणारा जगेल. सरकारने शेतकऱ्यांचा विचार करायला हवा होता मात्र सरकार तसे करताना दिसत नाही. असे देखील पवार यावेळी म्हणाले.

आधी हे लोक गांधी घराण्याला शिव्या घालत होते, नंतर नेहरूंनाही त्यांनी शिव्या घातल्या. आता यांचा मोर्चा माझ्याकडे वळला आहे. पण मी महाराष्ट्राचा मर्द माणूस आहे. मी नंग्यापुंग्यांना घाबरत नाही. अशा आविर्भावी लोकांना सत्तेतून खाली खेचायलाच हवे, त्यामुळे आता परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही. असा दम सुद्धा शरद पवार यांनी भरला आहे.