पुण्यात ‘तारे’जमीनपर; शरद पवारांसह ‘हे’ सात माजी मुख्यमंत्री येणार एकाच स्टेजवर

sharad pawar and tarangan

पुणे: महाराष्ट्र दिनी पुणेकरांना राज्याचे सात माजी मुख्यमंत्री हे पुण्यात एकाच स्टेजवर पहायला मिळणार आहेत, याला कारण आहे ते पुणे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या स्व. विलासराव देशमुख प्लॅनेटेरियम या थ्री डी तारांगणाच्या उद्घाटनाचे. १ मे महाराष्ट्र दिनी हा सोहळा पुण्यातील  राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये रंगणार आहे. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सात माजी मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच खगोलशास्त्राचे कुतूहल असते, त्यामुळे विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील तारांगणाची माहिती मिळावी यासाठी कॉंग्रेस नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या वतीने थ्री डी तारांगणाची उभारणी करण्यात आली आहे. अद्यावत टेक्नोलॉजीने सुसज्ज तारांगण उभारणी करणारी पुणे महापालिका हि देशातील पहिलीच महापालिका आहे. १ मे रोजी  जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. पालिकेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, मनोहर जोशी, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सात माजी मुख्यमंत्री एकाच स्टेजवर येणार असले तरी आजी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे फडणवीस हे या कार्यक्रमाला येणार नसल्याच सांगण्यात येत आहे.