fbpx

भुजबळांच्या भुजांना हिरे बळ देतील – शरद पवार

टीम मागराष्ट्र देशा : भाजपमध्ये प्रवेश हा हिरे कुटुंबियांचा अपघात होता. हिरे कुटुंबाची विचारधारा भिन्न आहे. मालेगावची राजकीय स्थिती बदलण्यासाठी छगन भुजबळ व जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला म्हणून हा पक्षप्रवेश झाला. भुजबळांच्या भुजांना प्रशांत, अपूर्व आणि अद्वय हिरे बळ देतील हा विश्वास आहे. अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी, भाजप असा चारही प्रमुख पक्षांमधील प्रवास करुन झाल्यावर आता भाजपमध्ये नाराज असलेले प्रशांत हिरे आणि माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे पितापुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

ऑगस्ट महिन्यातच हिरे यांचं राष्ट्रवादीत पुनरागमन होणार होतं. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांबरोबर मतभेद असल्यामुळे त्यांचा प्रवेश लांबला होता. आता भुजबळांशी समेट झाल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली. अपूर्व हिरे हे भाजपचे नाशिकमधून विधान परिषदेचे आमदार होते. उत्तर महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी हिरे पितापुत्रांचं राजकीय वर्चस्व होतं. भुजबळ समर्थकांनी काढलेल्या मोर्चालाही अपूर्व हिरे यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी भाजप आमदाराची ही भूमिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजप नेतृत्वाला हिरे कुटुंबाने एकप्रकारे दिलेला इशाराच होता.