शरद कळसकरने दाभोळकरांवर दोन गोळ्या झाडल्या; सीबीआयची कोर्टात माहिती

टीम महाराष्ट्र देशा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकरला पुण्यातील न्यायालयाने १० दिवसांसाठी सीबीआय कोठडी सुनावली असून. शरद कळसकरने दाभोलकरांवर दोन गोळ्या झाडल्या, असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातून कळसकरचा ताबा मिळवला होता. कळसकर हा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात होता. एटीएसने १० ऑगस्ट रोजी नालासोपारा येथून अटक केली होती. शस्त्र, स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. सोमवारी कळसकरचा ताबा मिळवल्यानंतर सीबीआयने त्याला मंगळवारी दुपारी पुण्यातील न्यायालयात हजर केले.

सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे यांनी कोर्टात सांगितले की, कळसकरने दाभोलकरांवर दोन गोळ्या झाडल्या. तो शस्त्र हाताळण्यात पारंगत असून दाभोलकर प्रकरणातील तो दुसरा मारेकरी आहे. सचिन अंदुरेसोबत तो देखील हत्येत सहभागी होता. या संपूर्ण घटनेचा तपास करायचा असून अमित दिगवेकर, राजेश बांगेरा व शरद कळसकर यांना समोरासमोर ठेवून चौकशी करायची असल्याने त्याला १४ दिवसांची सीबीआय कोठडी द्यावी, असे त्यांनी सांगितले.