तर शांतिगिरी महाराजांना लोकसभेची उमेदवारी ; गिरीश महाजन महाजन यांनी घेतली भेट

टीम महाराष्ट्र देशा : जगदगुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांच्या भक्तांकडून होत आहे. त्यातच बाबाजींनी भाजपाकडून लढावे, यासाठी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शांतीगिरी महाराज यांची भेट घेऊन ऑफर देखील दिल्याची चर्चा जय बाबाजी परिवारात आहे.

शिवसेना-भाजपाची लोकसभा निवडणुकीत युती न झाल्यास नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वामी शांतीगिरी महाराज यांची उमेदवारी भाजपाकडून जवळपास निश्चित झाल्याचा दावाही जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने आगामी काळात राजकारणाच्या शुद्धीकरणाची राज्यव्यापी मोहीम राबवली जाणार असून, राजकारणात चांगल्या निःस्वार्थी व्यक्तींनी यावे आणि मतदारांनी देखील अशा चांगल्या लोकांना मतदान करावे, यासाठी राज्यस्तरीय मोहीम राबवली जाणार आहे. मोहिमेबाबत मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद-नंदुरबार-नगर- जालना-धुळे-जालना यांसह राज्यातील विविध भागांतून बाबाजी परिवाराच्या भक्त परिवाराची बैठक ओझर येथील जनशांती धाम येथे पार पडली.