टुलकिट प्रकरणातील शंतनू मुळूकच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

बीड : मूळचा बीडचा रहिवाशी असलेला पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू मुळूक याच्यावर दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. शंतनूने दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयासमोर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या याचिकेवर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे. शंतनू मुळूक याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १७ फेब्रुवारी रोजी १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन दिला होता.

बीडचा रहिवाशी असलेल्या शंतनू मुळूक याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी कथित टूलकिट प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. शंतनू मुळूक च्या शोधासाठी दिल्ली पोलीस बीडमध्ये आले होते. त्यानंतर शंतनूला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १७ फेब्रुवारी रोजी १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला होता. त्यानंतर शंतनूने या प्रकरणाच्या चौकशीत देखील उपस्थिती लावली.

बंगळुरूतील दिशा रवीनंतर मुंबईतील वकील निकीता जेकब यांच्याबरोबरच बीड जिल्ह्यातील असलेल्या शंतनू मुळूक यांचाही टूलकिट प्रकरणात सहभाग असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलेला आहे. याप्रकरणात पोलिसांनी शंतनू यांच्या घराची झाडाझडतीही घेतली होती. तसेच दिल्लीतील न्यायालयाने शंतनू विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.

दरम्यान, शंतनूला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाने अंतरिम जामीन दिलेला असून, शंतनूने पोलिसांना चौकशी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं होतं. शंतनूने आता अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर न्या. धर्मेंद्र राणा यांच्यासमोर उद्या (दि. २४ ) सुनावणी होणार आहे. तर कथित टूलकिट प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दिशा रवीला एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या