fbpx

शमी मुस्लीम म्हणून त्याला संघातून वगळले, पाक मिडियाचा अजब दावा

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते. या सामन्यात भारताने मोहम्मद शमीला विश्रांती दिली होती. यावरून पाक मिडीयाने अजब दावा केला आहे.

या सामन्याविषयी चर्चा करताना पाकिस्तानातील एका चॅनेलवर क्रिकेट तज्ज्ञांनी हे भाजपाचे षडयंत्र असल्याचा दावा केला.”मी शमीला डच्चू दिला नसता. त्याने चार सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला असे बाकावर बसवू शकत नाही. त्याला विक्रम करण्याची संधी होती आणि शिवाय तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये अव्वल दोन किंवा तीन स्थानांवर पोहोचला असता. शमीला बाकावर बसवण्यासाठी कोणीतरी दबाव टाकला असावा. भाजपाचा जो मुस्लीमविरोधी अजेंडा आहे, हा त्याचाच भाग असावा,” असे मत क्रिकेटतज्ज्ञाने व्यक्त केले.

दरम्यान, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे. या दोनही सामन्यांतील विजेते १४ जुलैला फायनल खेळणार आहेत.