शहीदाच्या कुटुंबियांची फसवणूक करणा-यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अभिजित कटके

सातारा  : वडूज येथील शहीद जवान गोपाळ धुरगुडे (रा. धनगरवाडी, ता. वाई) यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून मिळालेली वडूज येथील जमीन बळकावण्याचा प्रकार घडला असून केंद्र सरकार व शहीद जवानाची फसवणूक व अवमान केल्याप्रकरणी संबंधितावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने केली आहे.

मनसे तालुकाप्रमुख दिगंबर श्रीरंग शिंगाडे यांच्यावर याप्रकरणी आरोप करण्यात आला आहे. शहीद जवान रामचंद्र धुरगुडे यांच्या कुटुंबियांबाबत घडलेल्या या प्रकाराबाबत तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे लेखी तक्रार करण्यात आली आहे. रामचंद्र गोपाळ धुरगुडे हे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना 5 डिसेंबर 1971 रोजी शहीद झाले. त्यांच्या पश्‍चात वीरमाता हौसाबाई गोपाळ धुरगुडे (रा. धनगरवाडी, ता. वाई) व त्यांच्या कुटुंबियांना सरकारने वडूज येथील शासकीय मिळकत जुना सर्व्हे नं. 320 व नवीन सर्व्हे नं. 169 मधील 5 एकर जमीन उदरनिर्वाहासाठी दिली होती. 31 जुलै 1975 रोजी ही जमीन हौसाबाई धुरगुडे वहिवाटत होत्या; परंतु 1976 मध्ये त्यांचे निधन झाल्याने आणि खटाव व वाई तालुक्यांमध्ये बरेच अंतर असल्याने धुरगुडे कुटुंबियांचे या जमिनीकडे लक्ष कमी झाले. याचा गैरफायदा घेऊन वडूज येथील दिगंबर श्रीरंग शिंगाडे याने वडूज तहसीलदारांसमोर 7 मार्च 2014 रोजी आपणच एकमेव वारस असल्याचे भासवून खोटे प्रतिज्ञापत्र केले व वडूज येथेच 15 मे 2013 रोजी मयत झाल्याची खोटी माहिती देऊन वडूज ग्रामपंचायतीकडून बोगस दाखला मिळवला. मृत्यूचा दाखला व प्रतिज्ञापत्र, इतर कागदपत्रे सादर करून जागेची नोंद 31 मे 2014 रोजी शहीद परिवाराची जमीन आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून शिंगाडे याने स्वतःचा हक्क सांगून वहिवाट सुरु ठेवली. शहीद कुटूंबाची जमीन त्याने बेकायदेशीरपणे बळकावलीच नाही तर आपण स्वतः त्यांचे एकमेव वारस असल्याचे भासवून भारत सरकार, शासकीय यंत्रणा व देशासाठी बलिदान देणा-या शहीद जवानाच्या कुटूंबाची घोर फसवणूक केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याची सखोल चौकशी करून मनसे खटाव तालुका प्रमुख दिगंबर श्रीरंग शिंगाडेसह दोषी यंत्रणेवर तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन संरक्षण मंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा सैनिक बोर्ड आदींना माहितीसाठी दिले असून या निवेदनावर नगरसेवक शहाजीराजे गोडसे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे, डॉ. संतोष गोडसे, पृथ्वीराज गोडसे, सुहास गोडसे, विक्रम गोडसे आदींच्या सह्या आहेत.