तुम्ही विरोध सुरुच ठेवा, मी तुमच्या पाठिशी – उद्धव ठाकरे

Uddhav-Thackeray-1

मुंबई – प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकरणी शहापूरच्या शेतक-यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट घेतली. प्रकल्पग्रस्तांना मातोश्रीवर आमंत्रित करुन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारसोबत असलो तरी शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिन, तुमच्या सुपीक जमीनी जाऊ देणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना यावेळी दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आपली सर्व महत्त्वकांक्षा पणाला लावली आहे. शेतक-यांना विश्वासात घेऊनचं समृद्धी हायवे प्रकल्प पूर्ण केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र, या प्रकरणी नाराज असलेल्या शेतक-यांसोबत मातोश्रीवर भेट घेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपाटले आहेत.

तुम्ही विरोध कायम ठेवा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असे अश्वासन शेतक-यांना दिल्याने मुख्यमंत्री विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. तसेच, विकासाच्या नावावर सरकारच्या वतीने प्रकल्पाच्या वेळी अनेक आश्वासने दिली जातात. पण काही करत नाहीत असे वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

शेतक-यांना त्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात असल्याचं वाटत आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि प्रकल्प समितीला भेटून या प्रकरणातून काय मार्ग काढता येईल, हे पाहणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.