‘चला हवा येऊ द्या’ मध्ये शाहरूख आणि अनुष्काची धम्माल

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची, त्यातील थुकरटवाडी गावाची आणि गावातील मंडळींची हवा आता बॉलिवुडमध्येही जोरदार वाढत आहे. या मंचावरुन आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी हिंदीतील स्टारही हजेरी लावत आहेत. आजवर हिंदीतील अनेक बड्या मंडळींनी या कार्यक्रमात सहभागी होत यातील कलाकारांसोबत धम्माल उडवून दिली होती. गेल्यावर्षी  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या ‘फॅन’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी बॉलिवुडचा किंग शाहरुख खानने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. थुकरटवाडीकरांची एनर्जी आणि उत्साह बघून तो त्यावेळी भारावून गेला होता आणि पुन्हा या कार्यक्रमात येण्याची इच्छाच व्यक्त नव्हती केली तर तसं वचनही त्याने दिलं होतं. आता पुन्हा एकदा आपल्या जब  हॅरी मेट सेजल या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुखने थुकरटवाडीची वाट धरली. यावेळी शाहरुख एकटाच आला नाही तर त्याच्यासोबत या चित्रपटाची मुख्य नायिका अनुष्का ही होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. चला हवा येऊ द्याचे हे दोन भाग प्रसारित होणार आहेत.

किंग खान आणि अनुष्काचं मराठमोळं रुप

मुळचा दिल्लीचा असलेला शाहरुख आता पक्का मुंबईकर झालेला आहे. मराठी पदार्थ, मराठी भाषा, मराठी  चित्रपट नाटक याबद्दल त्याला कायम आकर्षण आहे आणि तो हे नेहमी बोलून दाखवतो. त्याचं हेच मराठी प्रेम या कार्यक्रमातही बघायला मिळणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ मराठी माणसानेच रोवली त्यानंतर आलेला प्रभातचा काळ म्हणजे मराठी चित्रपटांचं सुवर्णयुगच.. मराठीच्या याच सुवर्णयुगाला मानाचा मुजरा करण्यासाठी शाहरुखने कुंजवनाची सुंदर राणी,माळ्याच्या मळ्यामंदी, तुझ्या रुपाचं पाखरु वेल्हाळ आणि गोविंदा रे गोपाळा या गाण्यांवर अनुष्काच्या सोबतीने नृत्य सादर केलं. याशिवाय निलेश साबळेसह नटसम्राटमधील स्वगतही सादर केले. शाहरुखच्या या मराठमोळ्या रुपात अनुष्काही सामिल झाली आणि तिनेही ‘ती फुलराणीचा’ ‘तुला शिकविन चांगलाच धडा’सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी तिने  साडी, गजरा असा खास मराठमोळा साज परिधान केला होता.

 

शाहरुखने केलं चला हवा ये द्याच्या कलाकारांचं कौतुक 

थुकरटवाडीकरांचा सिनेमा हा या कार्यक्रमाचं आकर्षणबिंदू असतो. याही भागात ‘बाजीगर’ या चित्रपटाची आपली खास आवृत्ती या मंडळींनी सादर केली आणि शाहरुखने त्याला खळखळून दाद दिली. लिखाणापासून अभिनयापर्यंत सर्वच बाबतीत हे कलाकार  धम्माल असून त्यांची एनर्जी दाद देण्यासारखी आहे. या  स्किटमध्ये भाऊ कदमने साकारलेला शाहरूख बघून आपण आपली स्टाईल विसरुन गेलो अशी दादही किंग खानने यावेळी दिली.

 


एकंदरीत धम्माल मजा मस्तीने सजलेले चला हवा येऊ द्याचे हे दोन्ही भाग प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणार आहेत. येत्या सोमवार आणि मंगळवारी (३१ जुलै आणि १ ऑगस्ट) रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन हे प्रसारित होतील.