उदगीरमध्ये रिक्षामधून पळवून नेऊन केला तिघांनी अत्याचार 

 उदगीर / ज्ञानेश्वर राजुरे : रिक्षाने घरी निघालेल्या एका महीलेस तिघांनी जबरदस्तीने शहराबाहेर नेऊन महिलेच्या गुप्तागांमध्ये दगडाचे खडे घालून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उदगीर शहरात गुरुवारी घडली या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       उदगीर शहरातील बोधननगर भागात राहणारी एक ४५ वर्षीय महीला शेल्हाळवरील शाहु चौका जवळून गुरुवार ( दि. १३ ) रोजी सायंकाळी सात वाजता रिक्षामध्ये बसून घरी जात असताना त्या महीलेचे तोंड दाबून शेल्हाळ रोडवर घेऊन गेले. तेथे त्या महीलेवर या तीन नराधमांनी अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर गुप्तागांमध्ये दगडाचे खडे घालून लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पिडीत महीला जखमी अवस्थेत तेथे विव्हळत पडली असताना एका नागरीकाने पाहिले व त्याने पोलिसांना फोन करुन माहीती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन त्या पिडीत महिलेस शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
        उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती , पोलिस निरिक्षक भिमाशंकर हिरमुखे , पोलिस निरिक्षक राजकुमार सोनवणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्या महीलेची प्रकृती बिघडत असल्याने सोबत महिला पोलिस उपनिरिक्षक सांगळे व कर्मचारी यांच्यासोबत पुढील उपचारासाठी लातूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले . त्या महीलेचा जबाब घेऊन शुक्रवार (  दि.  १४ ) रोजी सायंकाळी उदगीर शहर पोलिस ठाण्यात अनोळखी तिघांविरुध्द गु. र. न. १२५ / १७ कलम ३७६ ( ड ) , ३६७ , ३५४ ( अ ) , ३५५ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स पो नि सुधीर सुर्यवंशी करीत आहेत.
आरोपींच्या शोधात तीन पथके रवाना…
      रिक्षामधून घराकडे निघालेल्या महीलेस बळजबरीने पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन अनोळखी आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. तर या गुन्ह्यातील रिक्षाचा शोधही पोलीसांकडून घेण्यात येत आहे. भर रस्त्यावरुन जबरदस्तीने पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या या घटनेचे गांभीर्य ओळखून त्या दृष्टीने आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके गुरुवारी रात्रीपासून रवाना झाल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती यांनी सांगितले.