लिंग बदल : ललिता साळवे यांनी प्रथम `मॅट’कडे दाद मागावी; उच्च न्यायालयाचे निर्देश

टीम महाराष्ट्र देशा – लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी बीडमधील महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांनी प्रथम महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज येथे दिले. लिंग बदल करण्याकरता सुट्टी मिळावी, यासाठी केलेला अर्ज वरिष्ठ स्तरावर नाकारण्यात आला. त्यानंतर साळवे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी संबंधित असल्याने याचिकाकर्त्यांनी थेट न्यायालयात न येता आधी `मॅट’कडे दाद मागावी, असे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात हार्मोन व शारीरिक चाचणी केल्यानंतर डॉक्टरांनी ललिता यांना लिंग बदल करण्याची परवानगी दिली. या अनुषंगाने ललिता यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांकडे सुटीसाठी अर्ज केला. त्याची प्रत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनाही इ-मेलद्वारे पाठवली. या अर्जात शस्त्रक्रिया केल्यानंतरही पोलीस दलात कार्यरत रहाता यावे, असेही ललिता यांनी नमूद केले. मात्र वरिष्ठ स्तरावर या अर्जाला परवानगी नाकारण्यात आली. परिणामी ललिता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

You might also like
Comments
Loading...