सात हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; समाजकल्याण खात्याचा भोंगळ कारभार  

scholarship

बदनापूर : शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये शासनाने शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व इतर फी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला. तसेच याबाबत महा डी बी टी या संकेतस्थळावर आवेदन पत्र मागविले होते. यामध्ये मागवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटक्या वैकुंठ जाती जमाती, विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा समावेश होता.

महा डी बी टी या पोर्टलवर तांत्रिक अडचणी आल्यामुळे पुन्हा ऑफलाईन आवेदन पत्र सादर करण्याच्या सूचना देऊन आवेदन पत्र मागविले. मात्र वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.  केवळ अनुसूचित जाती जमातीच्या व्दितीय, तृतीय वर्षाच्या विद्यर्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे.

काही शिक्षण संस्था चालक हुशारी करून बोगस प्रवेश दाखवून शासनाची शिष्यवृत्तीची रक्कम हडप करतात. असे प्रकार राज्यातील काही जिल्ह्यात उघडकीस आल्यानंतर शासनाने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये भारत सरकार व इतर शिष्यवृत्तीच्या रक्कम महाविद्यालयांना थेट न देता विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क महाविद्यालयाच्या खात्यात तर भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता.

नवीन निर्णयानुसार एकूण रक्कम थेट विदयार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार होती. त्यासाठी शासनाने नवीन संकेतस्थळ महा डी बी टी नावाने सुरु केले. ऑगस्ट २०१७ मध्ये पोर्टल सुरु झाले असता बदनापूर तालुकयातील जवळपास ७  हजार अनुसूचित जाती जमाती ,इतर मागासवर्गीय ,विशेष मागासवर्गीय ,भटक्या जाती जमाती व पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन पत्र पोर्टल वर भरले परंतु पोर्टल मध्ये अनेक तांत्रिक  अडचणी निर्माण झाल्याने ऑक्टोंबर महिना उजाडला तरी महाविद्यालयांना गोपनीय कोड देण्यात आले नाही.

विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर केले मात्र समाजकल्याण खात्याने केवळ अनुसूचित जातीच्या नूतनीकरण झालेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर जमा केली व ऑफलाईन आवेदन पत्र भरलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष उलटून गेले तरी अद्याप वाटप केलेली नसल्यामुळे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थांचे शिष्यवृत्ती अर्ज  नूतनीकरण  करण्याचे आदेश देऊन नवीन प्रवेशित अनुसूचित जाती जमाती व इतर जातीच्या विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याचे आदेश दिले. असता विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

प्रतिक्रिया 

शासनाने महाविद्यालयाला शिष्यवृत्तीधारकांचे दिले जाणारे पूर्ण शुल्क विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी महा डी बी टी पोर्टल सुरु केले होते.  त्यामुळे आम्ही शिष्यवृत्तीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदन पत्र सादर केले परंतु डिसेंबर महिन्यात महाविद्यालयाचे निरोप आले कि ऑफलाईन शिष्यवृत्ती आवेदन पत्र दाखल करा पुन्हा कागदपत्र जमा करून ऑफलाईन आवेदन पत्र भरून दिले मात्र वर्ष संपले तरी आम्हाला शिष्यवृत्ती मिळाली नाही.

आकाश तारो –विद्यार्थी