बुमराहचा तिसऱ्या वनडेत अनोखा रेकॉर्ड

भारताने सलग सात एकदिवसीय मालिका जिंकल्या

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मार्टिन गुप्टिलची विकेट घेत एकदिवसीय सामन्यात 50 बळी पूर्ण केले . बुमराहने अवघ्या 28 व्या एकदिवसीय लढतीत हा पराक्रम केला आहे. या आगोदर भारताकडून सर्वात कमी एकदिवसीय सामन्यात ५० बळी घेण्याचा विक्रम अजित आगरकर याच्या नावावर आहे त्याने 23 सामन्यांत ५० बळी घेतले आहेत अशा प्रकारे कमीत कमी सामन्यांमध्ये 50 बळी मिळविणारा बुमराह दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद ५० विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडिसच्या नावावर आहे. त्याने 19 सामन्यांमध्ये 50 बळी घेतले होते.भारताकडून आगरकर आणि बुमराहनंतर मोहम्मद शमी (29 सामने), इरफान पठाण (31 सामने) आणि अमित मिश्रा (32 सामने) यांचा नंबर लागतो.

दरम्यान अखेरच्या एकदिवसीय सामन्यात अखेरच्या क्षणी न्यूझीलंडचा सहा धावांनी पराभव केला आणि भारताने सलग सात एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शतकवीर रोहित शर्मा – विराट कोहली यांच्या द्विशतकी भागीदारीतून उभारलेल्या 337 धावांचे संरक्षण करताना मात्र दमछाक झाली.

न्यूझीलंडला भारतात एकदिवसीय मालिका जिंकू न देण्याची परंपराही आजच्या विजयाने कायम ठेवली. पण, त्यासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. कानपूरमध्ये धावांचा पूर असलेल्या या सामन्यात विजयाच्या 338 धावांसाठी न्यूझीलंडने चांगलीच लढत दिली. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात 18 धावा फटकावण्यात आल्या आणि तेथूनच सामन्याचे रंग दिसू लागले होते.

भुवनेश्वरने 10 षटकांत दिलेल्या 92 धावा इतर गोलंदाजांवर दडपण आणणाऱ्या होत्या. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 15 धावांची गरज होती; परंतु बुमराने त्यांना आक्रमक फटका मारण्याची संधीच दिली नाही.

त्याअगोदर कॉलिन मुन्रो (75), केन विलिमयम (64), लॅथम (65) व निकोलस (37) यांनी भारतीय फिरकी गोलंदाजीही फिकी केली होती; परंतु अखेरच्या 10 व्या षटकापासून भारतीयांना विकेट मिळण्यास सुरुवात झाली आणि तेथून विजयाचे पारडे बदलत गेले.

न्यूझीलंड – 50 षटकांत 7 बाद 331 (मुन्रो 75- 62 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार, विलिमसन 64- 84 चेंडू, 4 चौकार, लॅथम 65- 52 चेंडू, 7 चौकार, निकोलस 37- 24 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार; भुवनेश्वर 1-92, बुमरा 3-47, चाहल 2-47).