‘पिफ’ मध्ये सात मराठी चित्रपटांमध्ये रंगणार चुरस

piff2018

पुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तील (पिफ) मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपट निवडले गेले आहेत. महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी या चित्रपटांच्या नावांसह महोत्सवात परीक्षण करणाऱ्या तज्ज्ञ परीक्षकांची नावे आज जाहीर केली. येत्या ११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान होणा-या या महोत्सवासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पटेल बोलत होते.

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व महोत्सवाचे उपाध्यक्ष समर नखाते, निवड समिती सदस्य व क्रिएटिव्ह हेड अभिजीत रणदिवे, निवड समिती सदस्य मकरंद साठे, ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’चे (एनएफएआय) संचालक प्रकाश मगदूम, ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) चे संचालक भूपेंद्र कँथोला या वेळी उपस्थत होते.

Loading...

या वर्षी विविध समस्यांबरोबर हलकेफुलके विषय देखील समर्थपणे मांडणारे सात मराठी चित्रपट ‘पिफ’मध्ये मराठी स्पर्धात्मक विभागात निवडले गेले आहेत. ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’, ‘कच्चा लिंबू’ अशा प्रदर्शित झालेल्या व रसिकांची पसंती मिळवलेल्या चित्रपटांबरोबरच ‘पिंपळ’, ‘झिपऱ्या’, ‘नशीबवान’ आणि ‘म्होरक्या’ असे महत्त्वाच्या विषयांवर बोलणारे अप्रदर्शित चित्रपट या विभागात असतील.

मुंबईतील आर. के. स्टुडिओला काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ‘पिफ’मध्ये ‘राज कपूर रेट्रोस्पेक्टिव्ह’ हा विशेष विभाग ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक राज कपूर यांच्या २३ चित्रपटांच्या ‘निगेटिव्ह’ प्रतींचा मौल्यवान ठेवा त्यांचे पुत्र अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर ‘पिफ’मध्ये उपस्थित राहून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे देखभालीसाठी सुपूर्द करणार आहेत.

यावेळी बोलताना डॉ. पटेल म्हणाले, ”पुणे ही राज कपूर यांची कर्मभूमी आहे. आर. के. स्टुडिओला लागलेल्या आगीनंतर रणधीर कपूर यांच्याशी वार्तालाप करताना राज कपूर यांच्या चित्रपटांच्या काही महत्त्वाच्या ‘निगेटिव्ह’ प्रती कपूर कुटुंबीयांनी वेगळ्या सांभाळून ठेवल्याचे समजले. तेव्हा त्यांना या प्रती ‘एनएफएआय’ला देण्याची विनंती करण्यात आली. त्यास प्रतिसाद देऊन कपूर बंधू ‘पिफ’मध्ये उपस्थित राहणार असून ऋषी कपूर हे महोत्सवात अभिनयाविषयी आपले विचार देखील व्यक्त करणार आहेत. तसेच ‘राज कपूर रेट्रोस्पेक्टिव्ह’ विभागाचे उद्घाटन राज कपूर यांचा ‘बॉबी’ हा चित्रपट दाखवून करण्यात येणार आहे.”

रणधीर कपूर यांनी गेल्या महिन्यात ‘एनएफएआय’ला भेट दिली असून येथील चित्रपट जतनाच्या सुविधांबाबत त्यांनी संतुष्टता व्यक्त केली, असे प्रकाश मगदूम यांनी सांगितले. ‘राज कपूर रेट्रोस्पेक्टिव्ह’मध्ये ‘बॉबी’बरोबर ‘मेरा नाम जोकर’, ‘संगम’, ‘श्री ४२०’ आणि ‘आग’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

नजिकच्या कालखंडात निधन झालेल्या काही मान्यवर कलाकारांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ‘मेरा गाव मेरा देश’ (अभिनेते विनोद खन्ना), ‘मैंने प्यार किया’ (अभिनेत्री रीमा), ‘न्यू दिल्ली टाईम्स’ (अभिनेते शशी कपूर), ‘कभी हां कभी ना’ (दिग्दर्शक कुंदन शहा) आणि ‘आर पार’ (अभिनेत्री श्यामा) हे चित्रपट ‘पिफ’मध्ये रसिकांना बघायला मिळणार आहेत. याशिवाय स्त्रियांच्या समर्थ भूमिका असणारे ‘तीन कन्या’ (सत्यजीत रे), ‘शंकराभरणम्’ (के. विश्वनाथ), ‘गेज्जे पूजे’ (पुतन्ना कनगल), ‘परिणिता’ (बिमल रॉय), ‘अवरगल’ (के. बालचंदर) या चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे.

ज्या रसिकांना त्यांच्या कार्यालयीन वेळांच्या कारणामुळे ‘पिफ’मधील चित्रपटांचा आस्वाद घेता येत नाही. त्यांनाही ते शक्य व्हावे या उद्देशाने यंदा ‘एनएफएआय’मध्ये रात्री ९ ते ११ या वेळेतही चित्रपट दाखवले जाणार आहेत, असे मगदूम यांनी सांगितले.

महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आठ चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पोलंडच्या दिग्दर्शिका जोआना कोस्क्राऊझ, श्रीलंकेचे दिग्दर्शक व ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे (एफटीआयआय) माजी विद्यार्थी विमुक्थी जयासुंदरा, मेक्सिकोचे दिग्दर्शक रॉड्रिगो प्ला, कॅनडा येथील दिग्दर्शक मॅथ्यू डेनिस, इटलीचे दिग्दर्शक मॉरिझिओ निकेती, इराणी अभिनेत्री गेलारेह अब्बासी, ‘तेजाब’, ‘रंग दे बसंती’ अशा गाजलेल्या चित्रपटांसह चाळीसहून अधिक हिंदी चित्रपटांचे लेखक असलेले कमलेश पांडेय, मल्याळम चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक बिजूकुमार दामोदरन (डॉ. बिजू) यांचा परीक्षकांमध्ये समावेश आहे.

‘पिफ फोरम’मधील कार्यक्रमांविषयी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, दर्जेदार चित्रपट पाहण्याबरोबरच ‘पिफ’मध्ये रसिक व अभ्यासकांसाठी ‘पिफ फोरम’ हा खास विभाग ठेवण्यात आला आहे. चित्रपटांशी संबंधित मान्यवर व्यक्तींची व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमधून चित्रपटांच्या विविध अंगांची माहिती या ठिकाणी घेता येईल. हे ‘पिफ फोरम’ महोत्सवाच्या प्रमुख चित्रपटगृहाच्या- अर्थात ‘सिटीप्राईड कोथरूड’च्या आवारात उभारण्यात येणार आहे.

मराठी सिनेमा स्पर्धा विभागातील चित्रपट खालीलप्रमाणे-

१) मुरांबा, दिग्दर्शक- वरूण नार्वेकर
२) पिंपळ, दिग्दर्शक- गजेंद्र अहिरे
३) झिपऱ्या, दिग्दर्शक- केदार वैद्य
४) नशीबवान, दिग्दर्शक- अमोल वसंत गोळे
५) फास्टर फेणे, दिग्दर्शक- आदित्य सरपोतदार
६) कच्चा लिंबू, दिग्दर्शक- प्रसाद ओक
७) म्होरक्या, अमर भरत देवकर

महोत्सवात १३ ते १७ जानेवारी दरम्यान ‘पिफ फोरम’मध्ये आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम खालीलप्रमाणे-

· विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान- विषय- पटकथा लेखन, वक्ते- मेक्सिकोचे दिग्दर्शक रॉड्रिगो प्ला, इटलीचे दिग्दर्शक मॉरिझिओ निकेती आणि हिंदी पटकथा लेखक कमलेश पांडेय

· व्याख्यान- राज कपूर आणि संगीत- वक्ते- सुश्रुत वैद्य

· चर्चासत्र- राज कपूर आणि त्यांचे चित्रपट- दिग्दर्शक सुभाष घई

· कार्यशाळा- विषय- ‘डिजिटल पोस्ट प्रॉडक्शन- अँन ओव्हरव्ह्यू’- मोहन कृष्णन्

· चर्चासत्र- विषय- ‘चित्रपटांचे जतन- काळाची गरज’- वक्ते- मोहन कृष्णन् व प्रकाश मगदूम

· परिसंवाद- ‘फेट ऑफ मराठी सिनेमा’- वक्ते- संजय पाटील, संजय छाब्रिया व नितीन वैद्य

· चित्रपट निर्मिती कार्यशाळा- श्रीलंकेचे दिग्दर्शक विमुक्थी जयासुंदरा

· व्याख्यान- ‘कंटेम्पररी अर्जेंटाईन सिनेमा’- वक्त्या- लुआंडा फर्नांडिस

· व्याख्यान- ‘ट्रेंन्डस इन द सिनेमा अँड मल्टीप्लेक्स बिझनेस’- राहुल पुरी

· व्याख्यान- ‘प्रॉडक्शन डिझायनिंग’

· शायरी व गीतांचा कार्यक्रम- ‘सुखन’- सादरकर्ते- ओम भुतकर व सहकारी

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई