सात लाख वारकरी पंढरीत दाखल

वेबटीम / पंढरपूर :वारकरी संप्रदायातील कुंभमेळा म्हणून आषाढी वारीला ओळखले जाते. वारकरी संप्रदायाला ज्या दिवसाची ओढ असते तो आषाढी  एकादशीचा उत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून रेल्वे, एसटी, तसेच खासगी वाहनांमधून सात लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

सात लाखांपेक्षा अधिक वारकरी आषाढी एकादशीचा अद्वितीय सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत आली पोहोचली आहे. त्यामुळे दर्शनासाठी तब्बल २२ तासांहून अधिक वेळ लागत आहे.रविवारी बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पार पडले़ .  सध्या शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांचा महापूर ओसंडून वाहू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ .