स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात

blank

टीम महाराष्ट्र देशा : ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते अशी जनभावना असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून केली आहे.

प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी, आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशा मागण्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.

blank

दरम्यान या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला होता. ईव्हीएम मशीन बाबत विरोधकांनी शंका व्यक्त करत मशीनमध्ये घोळ करून मतांमध्ये फेरबदल करता येतात, असा आरोप केला होता. त्यामुळे ही निवडणूक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र विरोधकांच्या या मागणीला निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवत निवडणूक ही ईव्हीएम मशीनवरचं होणार, असे जाहीर केले.