शिवसैनिकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच; शिवसेना उप-तालुकाप्रमुखावर हल्ला

नारायणगाव: शिवसेना कार्यकर्त्यांवर हत्येचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये शिवसैनिकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शहापूर तालुक्यातील अघई येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या करण्यात आली.

आता पुन्हा एकदा शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजाराम कोंडाजी चव्हाण यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून तीनजणांनी त्यांच्यावर लाकडी दांडके, लोखंडी पाइपने हल्ला केला. चव्हाण गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम चव्हाण हे वडज गावावरून नारायणगावला दुचाकीवरून येत असतांना त्यांना वाणी मळा येथे तिघे जणांनी थांबवले. त्याच क्षणी तिघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली. चव्हाण यांना लोखंडी पाइप व दांडक्याने डोक्याला, तोंडावर व अंगावर मारहाण केली. यात राजाराम चव्हाण गंभीर जखमी झाले.