सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने

पुणे  : नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तासनतास वाट पहावी लागत आहे.

सदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीसाठी नागरिकांना नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दस्त नोंदणीची ही संगणक प्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. या प्रणालीसाठीचे तांत्रिक सहकर्य हे एनआयसीकडून दिले जाते. राज्यात सुमारे 506 दुय्यम निबंधक कार्यालय असून या कार्यालयांमध्ये सदनिका, दुकाने, जमिन आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात.

या कार्यालयांमध्ये हे दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते. राज्यात रोज सरासरी आठ ते नऊ हजार दस्तांची नोंदणी होते.दस्त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हरच्या डाऊन होण्यामुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने सुरू होते. अपेक्षित वेग मिळत नसल्याने दस्त नोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर काहींना दस्त नोंदणीसाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यालयात यावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून दस्त नोंदणीच्या प्रणालीमधील तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे कामे अपेक्षित वेगाने होत नाही.

याविषयी वारंवार नागरिकांनी आपल्या तक्रारी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दिल्या आहेत. तरी यावर तोडगा काढण्यात नोंदणी विभागाला यश आलेले नाही.नोंदणी व मुद्रांक विभाग राज्याला महसूल देणारा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी सुमारे 21 हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.