fbpx

WTA Serena Williams- ८ आठवड्यांची गर्भवती असतानाही सेरेनाने जिंकले होते ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद..

न्यूयॉर्क : सेरेना विल्यम्सने ती २० आठवड्यांनी गर्भवती असल्याचा फोटो स्नॅपचॅट या सध्या गाजत असलेल्या सोशल नेटवर्किंग साईटवर टाकला आणि चर्चा सुरु झाली ती जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सेरेनाच्या प्रेगनंट असण्याची.

सेरेनाने काही मिनिटांनी तो फोटो स्नॅपचॅटवरून डिलीट केला परंतु क्रीडाजगतात मोठी चर्चा सुरु झाली. सेरेनाच्या बऱ्याच चाहत्यांच्या हे ध्यानात यायला थोडा उशीर लागला की ती जर आता २० आठवड्यांची गर्भवती असेल तर जानेवारीमध्ये तिने जेव्हा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले तेव्हा ती ८ आठवड्यांची गर्भवती असताना ते विजेतेपद पटकाविले. एखाद्या खेळाडूसाठी ही एक नक्कीच मोठी गोष्ट आहे.

 

सप्टेंबर महिन्यात सेरेना ३६ वर्षांची होत आहे. सेरेनाने जरी ती पोस्ट डिलीट केली असली तरी तिच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, “सेरेना २०१७ चा पूर्ण मोसम खेळणार नाही परंतु २०१८ मध्ये ती नक्की कमबॅक करेल. ”
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ‘रेडिट’ या वेबसाईटचा सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियनसोबत सेरेनाचा साखरपुडा झाला होता.
जगभरातील दिग्गज टेनिस खेळाडूंनी सेरेनाला सुपर मॉम बनण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेरेनाचा बालपणीचा मित्र आणि प्रसिद्ध टेनिसपटू अँडी रॉड्डीक पासून ते १८ ग्रँडस्लॅम विजेत्या ख्रिस एडव्हर्ट यांनीही सेरेनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

सौजन्य- महा स्पोर्ट्स