१७ सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता?

टीम महाराष्ट्र देशा :  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात राजकीय रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष यात्रा काढून पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. या यात्रेसोबतच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं तसंच पक्षांतराचं सत्र देखील सुरू आहे.त्यातच आता विधानसभा निवडणूकीसाठीची आचारसंहिता १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऐन नवरात्रौत्सवात लोकशाहीच्या या उत्सवाला सुरूवात होणार आहे. या बाबत सकाळ ने वृत्त दिले आहे.

विधानसभा निवडणुकीची गेल्या वेळेस आचारसंहिता १५ सप्टेंबरला लागू झाली होती.मात्र पितृपंधरावडा असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरणे इच्छुकांनी टाळले होते. यावर्षी २९ सप्टेंबरला घट स्थापना होणार आहे. त्यामुळे या घट स्थापने आधीच आचार संहिता लागण्याची शक्यता आहे.आचारसंहितेचा कार्यक्रम हा ४५ दिवसांचा असतो. ती लागू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आठवडाभराचा कालवधी दिला जातो. त्यामुळे ऐन नवरात्रौत्सवाच्या शुभ मुर्हूतावर इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

राज्यात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू आहे. या यात्रेचा समारोप १९ ते २० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिीतीत नाशिक येथे होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी आचारसंहिता लागू होत असल्याने मोदी यांचा रोड शो आणि सभेच्या माध्यमातून निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन भाजपकडून करण्यात आले आहे.

दरम्यान या आधी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी १३ सप्टेंबरपासून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होणार असल्याचं वक्तव्य केले होते . त्यांच्या सोबतच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात गणपतीनंतर आचारसंहिता लागणार असल्याचं म्हटलं होतं. १५ ऑक्टोबरच्या जवळपास विधानसभा निवडणुका होणार असल्याचं मुनगंटीवार हे म्हणाले होते.