ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, मंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

ठाणे : स्वराज्यासाठी कुणबी समाजाने मोठा लढा दिला आहे. शेतीत उत्तम काम करणारे हात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तलवार हाती घेऊ शकतात. हे कुणबी समाजाने सिद्ध केले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई झाले पाहिजे, अशी माझी भावना आहे. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ओबीसींच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच स्वतंत्र मंत्री नेमण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

ते कोकण विभागीय कुणबी महोत्सव -2016 च्या समारोपप्रसंगी शहापूर येथे बोलत होते. याप्रसंगी कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार कपिल पाटील, स्वागताध्यक्ष आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, श्यामराव पेजे कुणबी आर्थिक विकास महामंडळाला पुनरुज्जीवित करण्यात येऊन मार्चमध्ये या महामंडळास 50 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच महामंडळाच्या माध्यमातून कुणबी तरुणांमध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात येईल.

शहापूर-मुरबाड या भागामध्ये उत्तम निसर्गसंपदा असून पर्यटनाला मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेला उत्तम असा टूरिझम सर्किटचा आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोकणामधील पर्यटनवाढीसाठी आपण जी मदत देतो तशी किंबहुना त्यापेक्षा जास्त निधी देऊन या भागाचा पर्यटन विकास करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविषयी मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांचे समाधान झाल्यानंतरच महामार्गाचे काम पुढे नेले जाईल. यासाठी विविध पर्यायांचा अभ्यास देखील करण्यात येईल. तसेच हा महामार्ग निर्माण झाल्यास या भागातील शेतकरी तर समृद्धी होईलच, शिवाय आपले राज्य देखील संपूर्ण देशात 20 वर्षे आघाडीवर जाईल.

पेसा कायद्यामुळे बिगर आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यासंदर्भात आदिवासी सल्लागार समितीतील आदिवासी सदस्यांनी देखील चर्चा केली आहे. ज्या गावात 50 टक्क्यांपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असेल, अशाठिकाणी पेसा कायद्याच्या तरतूदी लागू कराव्या किंवा कसे ? याविषयी सर्वांशी चर्चा करुन पडताळणी करण्यात येईल. निश्चितपणे यामध्ये मार्ग काढण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.