भाजप शिवसेनेची शिवेंद्रराजेंना ऑफर, साताऱ्याच्या राजकारणात खळबळ

टीम महाराष्ट्र देशा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीमधूनच विरोध केला जात आहे. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा कायम केल्या जातात. मात्र आता खा उदयनराजे यांचे पक्षांतर्गत विरोधक आ शिवेंद्रराजे भोसले यांनाच भाजप शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची ऑफर दिली जात असल्याच खुद्द शिवेंद्रराजे यांनीच सांगितले आहे.

मतदारसंघातील सांडवली येथे पद्मावती देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम प्रसंगी जनसमुदायाला संबोधित करताना आ शिवेंद्रराजे यांनी भाजप शिवसेने संदर्भात वक्तव्य केले आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. सरकारकडे निधी मागितल्यावर शिवसेना भाजपवाले तुम्ही आमच्याकडे या. निधीची कमतरता पडू देणार नाही म्हणत असल्याच ते म्हणाले.

भाजप सेनावाले ऑफर देत असले तरी आता लगेच काही सांगता येत नाही. निवडणुका जवळ आल्या आहेत. पुढचं पुढे काय होतंय ते बघू. शेवटी जनतेची विकासकामे मार्गी लागली पाहिजेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे आ. शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.