fbpx

सेना-भाजपा लहान मोठा काही नसून आम्ही तर जुळे भाऊ : रावसाहेब दानवे

टीम महाराष्ट्र देशा : प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान मोदी उभे होते, आणि प्रत्येक ठिकाणी शिवसेना-भाजपने एकत्र काम केलं आहे. त्यामुळे मोठा भाऊ, लहान भाऊ असं काही नसून शिवसेना – भाजपा हे जुळे भाऊ आहेत. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. आता संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते ४० जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याच दरम्यान रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, महाराष्ट्रात आम्हाला ४२ च्या वरच जागा मिळणार, ४१ होणार नाही. आजपर्यंतचा अभ्यास आहे राष्ट्रवादी काँग्रेस ६ आणि ४ या आकड्यांच्या वर कधी गेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राज्यात पाच जागांच्या वर जाणार नाही याचा मला विश्वास आहे. असे रावसाहेब दानवे यांनी म्हंटले. याचबरोबर, मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. अनेक पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहिलं, कोणी सायकलवर निघालं तर कोणी हत्तीवर पण जनता भरकटली नाही. राज्यभरातल्या सभांमधून लोकांमध्ये उत्साह दिसत होता. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान मोदी उभे होते, आणि प्रत्येक ठिकाणी शिवसेना-भाजपने एकत्र काम केलं आहे. त्यामुळे मोठा भाऊ, लहान भाऊ असं काही नाही. शिवसेना – भाजपा लहान मोठा भाऊ नसून जुळे भाऊ आहेत. आम्ही विधानसभेला पण एकत्र लढा देऊ. असेही दानवे यांनी म्हंटले.