fbpx

वरिष्ठ पत्रकार मंगेश चिवटे यांना महात्मा बसवेश्वर समता पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडलेल्या आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांसाठी काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांना नुकतेच महात्मा बसवेश्वर समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेंगलोर येथील बसव समितीचे प्रमुख अरविंद जत्ती, परमपूज्य महंत स्वामीजी आणि उद्योजक महेश मुद्दा यांच्या हस्ते नवी मुंबई येथील एका कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लिंगायत समाजातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला, याच कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील करमाळयाचे रहिवाशी असलेले मंगेश चिवटे यांचा सन्मान करण्यात आला.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथील शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी आणि बसव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक व्यक्तींचा दरवर्षी सन्मान केला जातो. यावर्षी आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंगेश चिवटे यांचा तर पोलीस प्रशासनात उत्कृष्ट सेवा बजावत असलेल्या पोलीस निरीक्षक नागराज मजगे यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईत कार्यरत असणाऱ्या या दोघांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील असून श्री मजगे हे अक्कलकोट तर श्री चिवटे करमाळा येथील आहेत.

राज्यात २०१४  साली श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यावेळी इलेट्रॉनिक मिडियात पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या मंगेश चिवटे यांनी गोरगरीब रुग्णांच्या महागड्या शस्त्रक्रियांना थेट अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात यावा अशी संकल्पना मांडली होती. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अस्तित्वात आला. गेल्या  ४  वर्षात या कक्षाच्या माध्यमातून हजारो गोरगरीब – गरजू रुग्णांना ५००  कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या यशस्वी संकल्पनेनंतर श्री चिवटे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना मांडली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी १७ नोव्हेंबर २०१७ रोजी ठाणे येथून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची सुरूवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे मार्गदर्शनाखाली तथा युवासेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे आणि आरोग्य मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत १७ नोव्हेंबर २०१८ रोजी दादर येथील शिवसेना भवनात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वॉर रूमचे उद्घाटन करण्यात आले. सध्या मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख म्हणून काम पाहत असून नुकतीच महात्मा फुले जन आरोग्य योजनेवर निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईत आलेल्या रुग्णांच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून ते महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत किंवा धर्मादाय रुग्णांलयात सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करणेसाठी तसेच पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी , टाटा ट्रस्ट , सिद्धिविनायक ट्रस्ट आदि NGO च्या माध्यमातून गरजू रुग्णांना अर्थसहाय्य करणेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून समनव्याची भूमिका पार पाडली जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या धर्तीवर लवकरच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने गोरगरीब गरजू रुग्णांसाठी रिलीफ फंड उभारण्यात येणार असून मुंबईत सुसज्ज अशा धर्मशाळेची उभारणी देखील करण्यात येणार आहे.