fbpx

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन

Arun-Sadhu (1)

वेब टीम :ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अरुण साधू यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार नाहीत. पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी आणल्यानंतर रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे

चतुरस्त्र प्रतिभेच्या अरुण साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका, नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून विपूल लेखन केले. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर साधू यांची पकड होती. जवळपास ३० वर्षे पत्रकारितेत असलेल्या अरुण साधू यांनी ‘केसरी’, ‘माणूस’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फ्री प्रेस जर्नल’ अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. याशिवाय, त्यांनी रशिया, चीन व क्युबातील साम्यवादी क्रांतीवर आधारित पुस्तकांचेही लिखाण केले. ‘एक माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘कथा युगभानाची’, ‘बिनपावसाचा दिवस’ हे त्यांचे कथासंग्रही गाजले. ‘पडघम’ या नाटकाचेही लिखाण त्यांनी केले. ‘अक्षांश रेखांश’, ‘तिसरी क्रांती’, ‘सभापर्व’ यांसारखे त्यांचे ललित लेखनही वाचकांनी डोक्यावर घेतले.

एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला:मुख्यमंत्री

आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या साधू यांनी मराठी वाचकाला वास्तववादी दर्शन घडवले. त्यांच्या कादंबऱ्या समकालीन राजकीय- सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवितात. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांनी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा गौरव प्राप्त झालेल्या साधू यांचे व्यापक लिखाण पत्रकारिता आणि साहित्यविश्वात येऊ पाहणाऱ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे.

अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. ‘ग्रंथाली’सारख्या वाचक चळवळीतही ते अखेरपर्यंत सक्रिय होते. ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

अरुण साधू यांची साहित्यसंपदा

कादंबऱ्या 

झिपऱ्या , तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट

कथासंग्रह

एक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची (निवडक कथा – संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या  इमारती, मंत्रजागर, मुक्ती

नाटक : पडघम

ललित लेखन : अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)

समकालीन इतिहास : आणि ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती, तिसरी क्रांती

शैक्षणिक : संज्ञापना क्रांती