काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन

sharad ranpise

पुणे : काँग्रेसचे जेष्ठ नेते तसेच विधान परिषदेचे गटनेते , माजी आमदार शरद रणपिसे यांचे आज पुण्यातील जोशी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद रणपिसे यांच्यावर यापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता.

त्यानंतर त्यांची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मागील चार ते पाच दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. काँग्रेस पक्ष्याच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचं फार मोठं नुकसान झालं आहे. जेष्ठ तसेच मार्गदर्शक नेता गमावल्याची भावना काँगेस पक्षातून होत आहे.

शरद रणपिसे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1951 रोजी पुण्यात झाला होता. पुण्यातच त्यांचं बालपण गेलं. महाविद्यालयीन शिक्षण देखील त्यांनी पुण्यनगरीतच घेतलं. पुढे महाविद्यालयीन जीवनातच त्यांना राजकारणाचं वेड लागलं. पुढे काही काळातच त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.

महानगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून त्यांनी उत्तम काम पाहिले होते.

१२ आमदारांबाबत थेट राज्यपालांच केली होती विचारणा :

दरम्यान मागील काही दिवसापूर्वी रणपिसे चांगलेच चर्चेमध्ये देखील आले होते. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पुणे येथे विधानभवन येथे ध्वजारोहन कार्यक्रमानंतर राज्यपाल कोश्यारी आणि पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित मान्यवरांच्या भेटीगाठी घेत होते. यावेळी भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या शेजारी उभे असलेल्या शरद रणपिसे यांनी हात जोडून थेट राज्यपालांनाच बारा आमदारांची नियुक्ती लवकरात लवकर करा अशी विनंती केली. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत, ‘अजितदादा इथे आहेत, ते माझे मित्र आहेत, ते सरकारमध्ये आहेत…ते मला विचारणा करत नाहीयेत, तुम्ही का विचारणा करताय? असे म्हणले होते. यामुळे रणपिसे चर्चेमध्ये आले होते.

महत्त्वाच्या बातम्या